अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील व अन्य दोन जणांविरुद्ध अकोट शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर चप्पल व दगडफेक करीत हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी अॅड.सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून, सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आणि षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सोमवारी पुन्हा अॅड.सदावर्ते यांना पोलिसांनी गिरगाव कोर्टात हजर केले.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मास्टर माईंड असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांची आणखी चौकशी करणे गरजेचे गरजेचे आहे, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सुनावणीदरम्यान केला. मुंबई पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने अॅड. सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अॅड. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५३० रुपये घेतले, असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. हा दावा सदावर्ते यांची बाजू मांडणारे अॅड. गिरीश कुलकर्णी यांनीदेखील मान्य करत ते पैसे कर्मचाऱ्यांसाठीच गोळा केल्याचे स्पष्ट केले; पण याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजयकुमार गुजर यांच्यामार्फत फसवणूक केल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे ७४ हजार ४०० रुपये स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देऊन या चौघांनी जवळपास ३ कोटी रुपये घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील, अजयकुमार गुजर, प्रफुल्ल गावंडे यांच्या विरोधात अकोट शहर पोलिस ठाण्यात कलम ४२० आणि ४३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कुणालाही अटक केलेली नाही, अशी माहिती अकोट शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.