होय, ते १०० टक्के खरं आहे !

जळगाव : देवेंद्र फडणवीसांनी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांबाबत दिलेली आकडेवारी खरी आहे. मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाल्याचे मी सांगितल्याचे ते म्हणाले आहेत. मुस्लिम भागाचे नाव घेतल्याचेही त्यांनी सांगितले. ते १०० टक्के खरे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जळगाव येथे सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमित्त साधून काल गुरुवारी एकापाठोपाठ १४ ट्वीट्स करत शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. पवारांनी शुक्रवारी जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: मुंबई बॉम्बस्फोटांबाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका ट्वीटमध्ये मुंबई बॉम्बस्फोटांवेळी शरद पवारांनी अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिल्याचा उल्लेख केला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भात फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जेव्हा मुंबईत १२ स्फोट झाले, तेव्हा शरद पवारांनी मुस्लिम भागात झालेला १३ वा स्फोट शोधून काढला होता. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचं प्राधान्य होते, असे फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, १२ ऐवजी मुस्लिम भागात १३ वा स्फोट झाल्याचे आपण का सांगितले याचे कारण पवारांनी यावेळी दिले. ते म्हणाले, ज्या १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती हिंदूंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरले, ते मी स्वत: जाऊन बघितले. जो पहिला बॉम्बस्फोट झाला, ते साहित्य मी पाहिले. ते हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होते हे मला माहिती होते. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचे काम आणि मुंबईत आग लागावी, अशा प्रयत्नात होता. स्थानिक मुस्लिम त्यात नव्हते; पण मी बारावे ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत, असे पवारांनी याप्रसंगी नमूद केले.

ज्यांना तारतम्य कळत नाही, त्यांची विधानं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही
हिंदू-मुस्लिम दोघेही एकत्र आले आणि या परकीय शक्तीच्या विरुद्ध आपण उभे राहावे या मताशी मी आलो. त्यावेळी चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांच्याकडून मला समन्स आले. मला विचारले की, तुम्ही असे का म्हणाला? मी म्हटले, हे ऐक्य राहावे म्हणून बोललो. त्यांच्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, पवारांनी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता; पण हे तारतम्य ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रश्नाचे गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचं कारण नाही, असे  पवार यावेळी म्हणाले.


फडणवीसांच्या ट्विटचा मी आनंद घेतो : शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी १४ ट्विटसच्या मालिकेतून कलम ३७०, जातीयवाद अशा विविध मुद्द्यांवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवारांनी मतांसाठी विशिष्ट धर्माचे लांगूलचालन केल्याचा आरोप करून त्यांनी कलम ३७०, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून बदललेल्या भूमिकेवरून अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचे फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. विशिष्ट जातीधर्माच्या लोकांचे तुष्टीकरणाचे धोरण आणि राजकारण तसेच जातीय धुव्रीकरण करणे हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड असल्याची टीका केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा मी आनंद घेतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला जातीयवादी राजकारणाचा आरोपही खोडून काढला. फडणवीस माझ्यावर जातीयवादी असल्याचा आरोप कशामुळे करतात, हे ठाऊक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा छगन भुजबळ हे पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर मधुकर पिचड, अरुण गुजराथी आणि सुनील तटकरे या नेत्यांनी पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. ही सगळी नाव समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एका जातीभोवती सिमीत आहे, हे यामधून तरी दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलायला दुसरे काही शिल्लक नाही. त्यामुळे ते अशाप्रकारचे आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.

Share