‘द काश्मीर फाइल्स’नंतर आता ‘द दिल्ली फाइल्स’

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता ‘द दिल्ली फाइल्स’ हा नवा चित्रपट बनवणार आहेत. काम सुरू करणार आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी ट्विटवरून ही घोषणा केली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटात दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची वेदनादायी कथा रुपेरी पडद्यावर मांडून बरीच प्रशंसा मिळवली. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अग्निहोत्रींनी आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ते लवकरच त्यांचा पुढचा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ (The Delhi Files) वर काम सुरू करणार आहेत.


‘द काश्मीर फाईल्स’ने रचला २५० कोटींचा इतिहास
मागील महिन्यात ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक रूपयांची कमाई केली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अमानुष अत्याचार पाहून चित्रपटगृहात घोषणाबाजी होत असतानाच राजकीय क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली होती. या चित्रपटाच्या क्रेझने १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘जय संतोषी मां’ आणि १९९४ मध्ये आलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांची प्रेक्षकांना आठवण झाली. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासोबतच चित्रपटातील कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचेही खूप कौतुक झाले आहे.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1514828638696345600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514828638696345600%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowmarathi.com%2Fentertainment%2Fbollywood-news%2Farticle%2Fafter-the-kashmir-files-now-the-delhi-files-vivek-agnihotris-big-announcement%2F400264

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची स्टोरी दाखवून ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नवीन चित्रपटाविषयी माहिती देताना आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘दिल्ली फाईल्स’ या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची संधी आली आहे. “त्या सर्वांचे धन्यवाद, ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला आपले मानले. गेली ४ वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेतली. मी तुमचा TL स्पॅम केला असेल; पण काश्मिरी हिंदूंवर झालेल्या नरसंहाराची आणि अन्यायाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची वेळ आली आहे”, असे विवेक अग्निहोत्री यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द दिल्ली फाइल्स’ या नव्या चित्रपटाची घोषणा होताच, ते या चित्रपटात काय दाखवणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. कदाचित या चित्रपटामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित काहीतरी दाखवले जाईल, असा अंदाज काही जाणकारांना आहे, तर बहुतेक लोकांचा असे वाटते की, चित्रपटाची कथा २०२० च्या दिल्ली दंगलीवर आधारित असेल.

Share