न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असे कुठेही लिहिलेले नाही : गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई : न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा, असे कुठेही लिहिलेले नाही. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे लावू नये, असे लिहिलेले आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. लाऊडस्पीकरला परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेत परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणी त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटमही दिला आहे. मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढून टाकावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील ही परिस्थिती पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नयेत, असे न्यायालयाने सांगितले. ज्या मशिदी किंवा मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे, त्यामधील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेने कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात करावी, मंदिरात करावी, उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1515289778672975872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515289778672975872%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fhome-minister-dilip-walse-patils-big-statement-regarding-laudspeaker-on-masjid-ss01

 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. पत्रकारांशी बोलताना वळसे पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयावरही भाष्य केले. कोल्हापूरचा विजय आम्हाला अपेक्षित होता, आणखी मोठा विजय होणे अपेक्षित होते. भाजपने केवळ धार्मिक भावना पुढे करून प्रचार केला;परंतु त्याना लोकांनी नाकारले आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणातील जयश्री पाटील कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. तसेच शरद पवार यांच्या घरी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपान करून आलेले एसटी कर्मचारीदेखील होते, असे तपासात समोर आले आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

Share