झेंड्यावरून अचलपूरमध्ये राडा; जमावबंदी लागू

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेमुळे अचलपूर तसेच नजीकच्या परतवाडा शहरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. या दोन्ही शहरांत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत पोलिसांनी तणाव निर्माण करणाऱ्या १६ जणांना अटक केली आहे.

रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी दोन गटात धक्काबुक्की व दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमावाला पांगवले. संतप्त जमावाने पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली. परिस्थिती ताबडतोब नियंत्रणात यावी म्हणून अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरांत सध्या संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. खबरदारी म्हणून या दोन्ही शहरांत अतिरिक्त पोलिसांची तुकडीसुद्धा तैनात करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

https://twitter.com/ANI/status/1515894655711576064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515894655711576064%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=about%3Asrcdoc

 

अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन
दरम्यान, झेंडा काढण्याच्या घटनेनंतर सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातून वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये. अचलपूर व परतवाडा शहरामध्ये सध्या शांतता असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Share