कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी मुंबईतील गिरगाव न्यायालयात याबाबतचा अर्ज सादर केला. याला न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर पोलिसांचे पथक ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले. या ठिकाणी ॲड. सदावर्ते यांना ताब्यात घेऊन पथक मध्यरात्री कोल्हापुरात पोहोचण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्तेंविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बुधवारी दुपारी गिरगाव न्यायालयात कोल्हापूर पोलिसांचा अर्ज मंजूर झाला. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांचे पथक ॲड. सदावर्तेला ताब्यात घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले. पोलिसांचे पथक ॲड. सदावर्ते यांना घेऊन मध्यरात्री कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओके’ या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना त्याच दिवशी मुंबईत अटक झाली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच दरम्यान साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा झाल्याने त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सातारा न्यायालयाने सोमवारी (१८ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले व आज त्यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, गिरगाव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाला आहे.