गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काेल्‍हापूर येथील जिल्हा व सत्र न्‍यायालयाने सोमवार (२५ एप्रिल) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी काेल्‍हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात ॲड. सदावर्ते यांचा ताबा मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी मुंबईतील गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो मंजूर होताच कोल्हापूर पोलिसांनी काल अ‍ॅड. सदावर्ते यांना ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे आणले. त्यानंतर त्यांना कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
आवाजांचे नमुने घेणे, यु-ट्यूब तसेच इतर भाषणे तपासण्यासाठी अ‍ॅड. सदावर्ते यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. सरकारच्या वतीने सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे व फिर्यादी दिलीप पाटील यांच्या वतीने ॲड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. सदावर्ते यांच्या बाजूने ॲड. पीटर बारदेस्कर यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी कबूल केले की, मी दिलेल्या काही मुलाखती रेकॉर्डवर आहेत. युक्तिवादानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना पाच दिवस म्हणजे २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Share