संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय?

नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? राऊत उद्या अमेरिकेच्या पंतप्रधानांना घाबरत नाही असं म्हणतील;परंतु अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतो का? हे पाहणेही गरजेचे आहे. संजय राऊत यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना बाहेर आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य शिवराळ आहे. त्यांचे वक्तव्य घरी कुटुंबासोबत कुणी बघू शकत नाही, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठणाचा निर्धार रद्द केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राणा दाम्पत्याने पळ काढल्याची खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ‘मातोश्री’च्या वाटेला जाऊ नका नाहीतर २० फूट खाली गाडले जाल. शिवसेनेच्या अंगावर याल तर येताना स्मशानात गोवऱ्या रचून या, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. राणा दाम्पत्याच्या पाठीशी भाजप असल्याचाही आरोपही राऊत यांनी केला होता.

खासदार राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणताहेत त्यावर एवढा राडा कशाला? कुणी हनुमान चालिसा म्हणतो म्हणून इतकी माणसे जमा करायची, हे बरोबर नाही. रवी राणा आणि नवनीत राणा गेले असते ‘मातोश्री’ वर आणि एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालिसाचे पठण केले असते. कुणी दखलही घेतली नसती. ते हल्ला करायला जाणार नव्हते. कुणाच्याही घरावर आंदोलन करण्यास आमचाही विरोध आहे. कुणाच्या घरावर जाणे व हल्ला करणे हे योग्य नाही. असे केल्याने सहानुभूती मिळेल, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र, त्यांना सहानुभूती मिळणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

गृहमंत्रालयाचे बारा वाजलेत!
पोलिसांना हाताशी धरून हे सगळे चालले आहे. पोलिसांच्या भरवशावर सत्तेचा माज सुरू आहे. गृहमंत्र्यांना चांगले माहीत आहे की, राष्ट्रपती शासन कधी लागते. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सर्व माहीत आहे. वळसे पाटील यांना कमीपणा वाटला पाहिजे की, ते गृहमंत्री असताना गृहमंत्रालयाचे बारा वाजले आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Share