मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनमध्ये जात असताना व तेथून बाहेर पडताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनीच शिवसैनिकांना हल्ल्याची परवानगी दिल्याने हा प्रकार घडला. मला मुंबई पोलिसांची शरम वाटते, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी खार पोलिस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले. कालचा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट होती. झेड सुरक्षा व्यवस्था असलेली व्यक्ती कळवून पोलिस ठाण्यात येते. आपल्यावर हल्ला होईल, असे पोलिसांना सांगते. त्यानंतरही या व्यक्तीवर हल्ला होतो. यामधून दोनच अर्थ निघतात. एकतर पोलिसांचे या हल्ल्याला समर्थन होते किंवा पोलिस इतके अकार्यक्षम झाले आहेत की, ते हल्ला रोखू शकत नाहीत. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या संरक्षणात हयगय करणे हे गैरवर्तन आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा कोणीही सुरक्षित राहणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गुंडागर्दी सुरू आहे. जे लोक महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर असे हल्ले करण्याचे काम सुरू आहे. आम्ही ‘इट का जवाब इट से देंगे’, असा इशाराही यांनी यावेळी दिला.
देशात नाव असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यांची अब्रू घालवली असून, राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जात आहे, असे सांगून फडणवीस यांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्यासंदर्भातही भाष्य केले. हनुमान चालिसा वाचू, असे म्हणणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन अटक केली जाते. आता हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊन वाचणार का? पोलिसांनी एका महिलेला रात्रभर कोठडीत ठेवले. एका महिलेला घाबरून शिवसैनिकांना तिच्यावर हल्ला करायला सांगण्यात आला. रात्रीच्या वेळी एका महिलेला तुरुंगात ठेवता येत नाही, तरीही असा प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून खा. नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली आहे, असे ते म्हणाले.
शरद पवारांनीच आत्मचिंतन करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात येणाऱ्या जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वत:च्या राज्याचा विकास करतात, या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात कोणीही यायला का तयार नाही, या गोष्टीचे आत्मचिंतन शरद पवार यांनीच करायला पाहिजे. पाच वर्षांनंतर महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू झाले आहे. राज्यातील दोन मंत्री तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात कोण येणार? महाराष्ट्रात येणाऱ्या मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या स्वागताला एक साधे उपसचिव जातात. साधी गाडी पाठवली जाते. जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणार असेल तर कोण कशाला महाराष्ट्रात गुंतवणूक करेल, असा सवाल करून महाराष्ट्रात गुंतवणूकदार यायला का तयार नाहीत, यावर सरकारने आत्मचिंतन करावे, असे फडणवीस म्हणाले.