अकोला : मुलीला सासरी न पाठवल्याचा राग आल्यामुळे जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी येथे घडली आहे. गजानन पवार असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी जावई नीलेश विठ्ठल धुरंदर यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी येथील मृत गजानन पवार यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या चार महिन्यापासून त्यांची मुलगी माहेरी पाथर्डी येथे आली होती. २३ एप्रिल दिवशी त्यांचा जावई नीलेश विठ्ठल धुरंदर (रा. उमरी, ता. तेल्हारा) हा आपल्या पत्नीला सासरी पाथर्डी येथे घेऊन जायला आला होता. मात्र, ‘वडील घरी नाहीत त्यांना येऊ द्या, नंतर बघू’ असे नीलेशच्या पत्नीने म्हटले. दरम्यान, काही वेळाने मुलीचे वडील गजानन पवार हे घरी आले. सासरा आणि जावई या दोघांमध्ये मुलीला सासरी पाठवण्याच्या कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात जावई नीलेश तेथून निघून गेला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अंगणामध्ये सासरे गजानन पवार हे घराच्या अंगणामध्ये खाटेवर झोपलेले असताना आरोपी जावई नीलेश तेथे आला. त्याने झोपलेल्या सासऱ्याच्या मानेवर धारदार चाकूने वार करून रक्तबंबाळ केले.
यानंतर जखमी गजानन पवार यांनी आरडाओरड केली असता त्यांची मुलगी धावत बाहेर आली असता तिचा पती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता. यावेळी पुन्हा वार करणार तोच मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडाओरड केली तेव्हा आरोपी तेथून पसार झाला. गजानन पवार यांना दवाखान्यात घेऊन जाण्याअगोदर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या दोन तासात शोध घेत आरोपी जावई नीलेश विठ्ठल धुरंदर यास पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी कलम ३०२,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.