वीज पडून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

हिंगोली : शनिवारी मध्यरात्री हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. यादरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारामध्ये वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. रामप्रसाद मारोतराव चव्‍हाण (वय २८ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

औंढा तालुक्यातील करंजाळा येथील रामप्रसाद चव्हाण यांचे जवळाबाजार शिवारात शेत आहे. सध्या शेतामध्ये हळद वाळविण्यासाठी ठेवण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान होईल या भीतीने रामप्रसाद चव्हाण व अन्य दोघे शेतात हळदीवर टाकण्यासाठी प्लास्टिक कागद घेऊन गेले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे रामप्रसाद चव्हाण एका झाडाखाली थांबले. झाडावर वीज कोसळली. त्यामुळे रामप्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे जण या झाडापासून दूर असल्याने जखमी झाले आणि विजेपासून बचावले.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गावकऱ्यांनी रामप्रसाद चव्हाण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला.

Share