निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

पुणे : निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे वृद्धापकाळाने आज सोमवारी (२५ एप्रिल) निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने प्रशासनावर हातखंडा असणारा, संवेदनशील अधिकारी, परखड भाष्य करणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय कारकीर्दीसोबतच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रिय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसेच प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठीही डॉ. गोडबोले यांनी केलेले लेखन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. माधव गोडबोले यांची कारकीर्द

डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. डॉ. गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच. डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तसेच नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. त्याअगोदर डॉ. गोडबोले यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्त सचिव म्हणूनही काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष होते. मनिला येथील आशियाई विकास बँकेत त्‍यांनी ५ वर्षे काम केले होते.

केंद्र सरकारचे गृहसचिव असताना १९९३ मध्ये डॉ. गोडबोले यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी प्रशासकीय धोरणांच्या अनुषंगानेही जबाबदारी पार पाडली. निवृत्तीनंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव राव यांच्या कार्यकाळात भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्याची घटना होत असताना ते केंद्रीय गृहसचिव म्हणून कार्यरत होते.

डॉ. माधव गोडबोले यांनी प्रशासनासह साहित्यसंपदेतही आपला ठसा उमटवला. गोडबोले यांनी जवळपास २२ पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाला आहे. An unfinished innings हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘अपुरा डाव’ या नावाने प्रकाशित झाले आहे, तर भारताच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition-An Inquest या पुस्तकाचीही चर्चा झाली. गोडबोले यांच्या मराठीतील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

Share