माझ्यावरील हल्ल्याचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना सादर : किरीट सोमय्या

नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. सोमय्यांवर झालेल्‍या हल्‍ल्‍याचे पुरावे गृहसचिवांना सादर करून या शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील मागील काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जवळपास २० मिनिटे चर्चा केली व दिल्लीतील विशेष पथक महाराष्ट्रात पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ. राहुल नार्वेकर, भाजप महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश होता. या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही केंद्रीय गृहसचिवांना सर्व पुरावे सादर केले आहेत. त्यांना राज्यातील ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाराची माहिती दिली आहे. राज्यातील कायदा-सुवस्थेसंबंधीची माहिती दिल्यानंतर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली. दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेईल. सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले चिंताजनक असून, परिस्थितीचा अभ्यास करू, गरज भासल्यास राज्यात पथक पाठवू, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय सचिवांकडून देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1518460658274107392?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518460658274107392%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fafter-discussions-with-union-home-secretary-kirit-somaiyas-frist-reaction-to-the-media-msr-87-2902115%2F

सोमय्या यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्ला यांच्याशी आमची बरीच विस्तृत चर्चा झाली. २०-२५ मिनिटांच्या चर्चेत, त्यांच्या चेहऱ्यावर देखील चिंता दिसत होती. ज्या प्रकारे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींवर ज्या प्रकारे हल्ले, अत्याचार सुरू आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते करत आहेत. या संदर्भात आणखी तक्रारी इथे आलेल्या आहेत, असे दिसून आले आहे. आज आम्ही अशी सात उदाहरणे गृहमंत्रालयास दिली आहेत.

सोमय्या म्हणाले, पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. खार रोड पोलिस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. माझ्या मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा डाव होता. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडेंनी घडवून आणला. ठाकरे सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. माझ्या विरोधात खोटी तक्रार पोलिसांकडे केली आहे. मी न केलेली तक्रारही माझ्या नावाने ठाकरे सरकारने खपवली आहे. पोलिस आयुक्त संजय पांडेंनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले असून, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हा मुद्दा केवळ किरीट सोमय्यांचा नाही, तर मुद्दा नौदल अधिकाऱ्यापासून एका झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचे मुंडण केले जाते, नौदल अधिकाऱ्याच्या घरात शिवसेनेचे गुंड हे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून जातात आणि मारहाण करतात. मनसुख हिरेनची उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेले दोन पोलिस अधिकारी सुपारी घेऊन हत्या करतात. आमदार, खासदाराला जिवंत गाडण्याची धमकी दिली गेली. केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलिस स्टेशनच्या परिसरात, पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ७०-८० गुंड दगड व बाटल्या फेकून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. याच्या चौकशीसाठी विशेष पथक पाठवले पाहिजे. परिस्थिती चिंताजनक आहे, असे आम्ही गृह सचिवांना सांगितले असून, त्यांनी आम्हाला आश्वस्त केले आहे, हा विषय आम्ही गांभीर्याने अभ्यासत आहोत, गरज भासल्यास राज्यात पथक पाठवू, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय सचिवांकडून देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Share