कोंढवा परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला आग

पुणे : पुण्यातील कोंढवा (बुद्रुक) परिसरातील पारगेनगर येथील फर्निचरच्या गोडाऊनला आज (मंगळवार) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा (बुद्रुक) परिसरातील पारगेनगर भागात मोठ्या प्रमाणात सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचरचे गोडाऊन आहेत. त्यातील एका गोदामाला मंगळवारी (२६ एप्रिल) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. फर्निचर आणि अन्य साहित्यदेखील गोदामात असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. या आगीत फर्निचरचे संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जात आहेत. मात्र, लाकडे साहित्य आणि फोमयामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आगीत जीवित हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर तसेच फर्निचर बनवणाऱ्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Share