आजोबांनी केले नातीचे जंगी स्वागत; हेलिकॉप्टरमधून आणले घरी!

पुणे : हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्यासाठी लोक काहीही करतात. अलिकडच्या काळात अनेकांकडून मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. असाच एका मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव पुणे शहरात चर्चिला जात आहे. पुणे शहरातील बालेवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या नवजात नातीचे आणि बाळंतीण सूनेचे थाटात स्वागत करत चक्क हेलिकॉप्टरनेच  त्यांना घरी आणले. मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे, असा संदेश या आजोबांनी आपल्या कृतीतून सर्व समाजाला दिला.

आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझे, अशी चुकीची समजूत कायम असल्याचे उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून दिसून येते, तर दुसरीकडे याच जुन्या विचारांना तिलांजली देत मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत केल्याची उदाहरणेही पहायला मिळतात. मुलीच्या जन्माच्या जंगी स्वागताची आगळीवेगळी घटना पुणे शहरातील बालेवाडी येथे नुकतीच घडली. बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडुरंग बालवडकर यांनी आपल्या नातीला चक्क हेलिकॉप्टरमधून घरी आणून तिचे थाटात स्वागत केले. अजित पांडुरंग बालवडकर आणि संगीता अजित बालवाडकर यांचा मुलगा कृष्णा बालवडकर, सून अक्षता बालवडकर यांना क्रियांश हा पहिला मुलगा आहे, तर दुसरी मुलगी क्रिशिका नुकतीच जन्माला आली आहे. आपल्या नातीचे थाटात स्वागत करायचे, अशी अजित बालवडकर यांची इच्छा होती.

https://twitter.com/ANI/status/1519068657825251328?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519068657825251328%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fmaharashtra%2Ffarmer-from-balewadi-hired-a-helicopter-to-bring-his-newborn-granddaughter-and-daughter-in-law-to-his-house-358760.html

अजित बालवडकर यांच्या सुनेचे (अक्षता बालवडकर) माहेर पुण्याजवळ मांजरी फार्म, शेवाळवाडी येथे आहे. सुनेच्या माहेरातून सूनेसोबत नातीला म्हणजे क्रिशिका हिला बालेवाडीतील पाटील वस्ती येथील निवासस्थानी आणण्यासाठी त्यांनी चक्क हेलिकॉप्टर पाठविले. सून आणि नातीला घेऊन येणारे हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी बालेवाडीतील पाटील वस्ती येथे खास हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून बालवडकर यांनी आपल्या नातीला वाजत-गाजत, फुलांनी सजविलेल्या कारने घरी आणले. मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले. बालवडकर यांची नात क्रिशिकाचे आत्या नीलम दिनेश पिंजन, कोमल संदेश आव्हाळे, सुषमा ऋषिकेश गायकवाड, मावशी अंकिता सुरेश शेवाळे, मामा यश सुरेश शेवाळे यांनी थाटात स्वागत केले.

अजित बालवडकर यांनी आपल्या लाडक्या नातीला हेलिकॉप्टरमधून थाटात घरी आणले. तिचे जंगी स्वागत केले. नातीचे असे जंगी स्वागत करत ‘कन्यारत्न येता घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी बालवडकर यांनी सार्थक ठरविल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सोबतच बालवडकर यांनी ‘मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे,’ त्याचबरोबर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेशही आपल्या कृतीतून समाजाला दिला. बालवडकर यांनी नातीला चक्क हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Share