येस बँक-डीएचएफएल घोटाळा : सीबीआयची मुंबईसह पुण्यात छापेमारी

मुंबई : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात आज आठ ठिकाणी छापे मारले. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक व उद्योगपती अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. हे तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) चे प्रवर्तक असलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याशी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालया (ईडी) सोबतच केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सुद्धा तपास करत आहे. सीबीआयने केलेल्या तपासात रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांचा या गुन्ह्यातील सहभाग समोर आला.
रेडियस ग्रुपने मुंबईच्या उपनगरात सुमेर ग्रुपसोबत भागीदारीत असलेल्या एका निवासी प्रकल्पासाठी डीएचएफएलकडून तब्बल ३ हजार ९४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज व्याजासह थकीत आहे. सीबीआयने अखेर गुरुवारी रेडियस ग्रुपचे प्रमुख व बिल्डर संजय छाब्रिया यांना अटक केली. त्यानंतर आता सीबीआयने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह उद्योजक शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे.

सीबीआय मुख्यालयातील टीमने मुंबई युनिटसह आज सकाळी मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी छापे टाकले. पुण्यात अविनाश भोसले यांच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एबीआयएल) परिसरात छापेमारी करण्यात आली. तसेच २-जी घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्यासह उद्योगपती विनोद गोयंका यांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून या तिघांच्याही मुंबई आणि पुण्यातील निवासस्थाने आणि कार्यालयांची झडती घेतली जात आहे.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिक आणि एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. ते कॉंग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असून, महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पुण्यातील अविनाश भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. ईडीने ‘फेमा’ कायद्याअंतर्गत कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

संजय छाब्रिया यांना ६ मेपर्यंत कोठडी
येस बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने रेडियस ग्रुपचे प्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया याला गुरुवारी अटक केली होती. संजय छाब्रिया यांना सीबीआयच्या न्यायालयाने ६ मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. या घोटाळा प्रकरणात याआधी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share