जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर येथे झेंडा लावण्यावरून सोमवारी रात्री उशिरा दोन गट एकमेकांना भिडले. दोन गटातील वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत चार पोलिस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. सध्या जोधपूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
जोधपूर येथील जालोरी गेट जवळील स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर काल सोमवारी रात्री ध्वज आणि ईदशी संबंधित बॅनर लावण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली. एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. निदर्शकांनी झेंडा आणि बॅनर काढून टाकल्याने गोंधळ झाला. इतर समाजातील लोक संतप्त झाले आणि दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, वाहनांचे नुकसान झाले, जमावाने लाऊडस्पीकरही खाली पाडले.
या वादाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, अर्धा तास दगडफेक थांबली नाही तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीमार करूनही दगडफेक थांबत नसताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. रात्री उशिरा शहरात झालेल्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सियाग यांच्यासह दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले. या हिंसाचारात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सध्या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जोधपूर शहरात आज मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा १५ ते २० गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरहून वरिष्ठ पोलिस अधिकारी जोधपूरला रवाना झाले आहेत. जोधपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
रात्री उशिरा पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सूरसागरचे आमदार सूर्यकांता व्यास आणि महापौर विनिता सेठ घटनास्थळी पोहोचले. जालोरी गेट पोलिस चौकीबाहेर बसून दोघांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याचे आमदार सूर्यकांता व्यास यांनी सांगितले. मग पोलिसांनी एकीकडे लाठीमार का केला? असा सवाल करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे केली आहे.
https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1521346577717088256?s=20&t=Rvb6DjxyE5o9XYB3ngkTzQ
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जोधपूरमधील जालौरी गेटजवळ दोन गटांमध्ये तणाव निर्माण होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने शांतता कायम राखण्यासाठी कडक पावले उचलावीत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या पंरपरेचा सन्मान करत सर्वांनी शांतता कायम राखण्याचे आवाहन गहलोत यांनी केले आहे.