राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा निर्णय स्‍वागतार्ह : शरद पवार

कोल्‍हापूर : केंद्र शासनाने राजद्रोहाच्‍या कायद्यात फेरबदल करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्‍य आणि स्‍वागतार्ह आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खा. शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर राजद्रोहाचे कलम १२४-अ रद्द करण्याबाबत विचार व्हावा, अशी भूमिका मांडली होती. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेतही पवारांनी यावर भाष्य केले. हे कलम १८९० साली इंग्रजांनी आणले होते. पूर्वीच्या काळी राजाविरोधात कोणी आवाज उठवला तर या कलमाचा वापर केला जात असे. मात्र, आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे हे कलम आता कालबाह्य असल्याची भूमिका मी मांडली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही याबाबत भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारने आम्ही या कलमाचा फेरविचार करणार आहोत, असे म्हटले आहे. असे असेल तर ही चांगली बाब आहे, असे खा. शरद पवार म्हणाले.

सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणाविरोधात बोलण्‍याचा घटनेने दिलेला अधिकार आहे. या अधिकारावर कोणाला गदा आणता येणार नाही. त्‍यामुळे सरकारच्या विरोधात बोलणे राजद्रोह कसा हाईल? असा सवाल करून पवार म्‍हणाले, कोरेगाव-भीमामध्‍ये वाद निर्माण झाला. तो मिटविण्‍याची जबाबदारी तत्‍कालीन भाजप सरकारचीच होती;परंतु त्‍यांनी तसे न करता १२४ अ कलमाचा वापर करत गुन्‍हे दाखल केले. यावर आपण या कायद्यात बदल करण्‍याची भूमिका मांडली होती. सुरुवातीला त्‍याला केंद्राने नकार दिला; पण आता राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा निर्णय केंद्र सरकार घेत असेल तर योग्‍यच आहे.

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय
स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करा, असे निर्देश सर्वोच्च न्‍यायालयाने दिले आहेत. याचा अर्थ दोन आठवड्यात निवडणुका घ्‍या, असा होत नसल्‍याचे आपले मत आहे. ज्‍या टप्‍यावर निवडणूक थांबली आहे तेथून पुढे प्रक्रिया सुरू करावयाची. त्‍यामुळे अजून तीन, चार महिने निवडणुका होऊ शकत नाहीत, असे सांगून पवार म्‍हणाले, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

राज ठाकरे अयोध्‍येला चाललेत त्‍यात काय विशेष?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातू रोहित पवारही काल अयोध्‍येला जाऊन आला. राज ठाकरे अयोध्‍येला चाललेत त्‍यात काय विशेष? कोणीही कोठे जाऊ शकतो. सध्या महागाई, बेकारीचा प्रश्‍न प्रचंड गंभीर बनला आहे. याच्‍या विरोधात लोक यापुढील काळात चळवळ व्‍यापक करतील. त्‍यामुळे या मूलभूत प्रश्‍नांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्‍याकरिता भोंग्‍यासारखे प्रश्‍न निर्माण करून वातावरण बिघडविण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे, धार्मिक भावनांच्‍या आधारे चळवळी उभ्‍या केल्‍या जात आहेत. हे समाजाच्‍या दृष्टीने वाईटआहे.

भाजपला पर्याय उभा करण्‍यासाठी सर्वांनी एकत्र यावे 
भाजपला पर्याय उभा करण्‍यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे; परंतु प्रत्‍येक राज्‍यातील परिस्‍थिती वेगळी आहे. तेथील प्रश्‍न निराळे आहेत. त्‍यामुळे त्‍या पातळीवर चर्चा झाली पाहिजे. पश्‍चिम बंगालमध्‍ये काँग्रेस व कम्‍युनिस्‍ट पक्ष ममता बॅनर्जीच्‍या विरोधात लढला, केरळमध्‍ये कम्‍युनिस्‍ट, राष्‍ट्रवादी एकत्र आहेत. ही परिस्‍थिती समजून घेऊन प्रथम त्‍यातून मार्ग काढला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत काँग्रेस व शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला. संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, मी स्वत: राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत महाराष्ट्राचे काही प्रश्न आले तर आम्ही स्वत:चा पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन करत होतो. तेव्हा आम्हाला संभाजीराजेंचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. तसेच संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्‍यक्ष आर. के. पोवार, व्‍ही. बी. पाटील, व्‍यंकाप्‍पा भोसले आदी उपस्‍थित होते.

Share