अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; कळवा पोलिसांत गुन्हा दाखल

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे हिने शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ”तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक…” अशी कविता केतकी चितळे हिने फेसबुकवर पोस्ट केली आहे. केतकी चितळे ही मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली होती. केतकीने फेसबुकवर शेअर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केतकीने या पोस्टमधून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक केतकीला ट्रोल करत आहेत, तर पवार विरोधकांकडून या पोस्टसाठी तिचे कौतुकही केले जात आहे.

केतकी चितळे हिने केलेल्या या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून केतकी चितळेविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केतकी चितळेविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ‘केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केली. यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. अशा पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केतकी चितळेने ही पोस्ट करून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. या महिलेने आणखी अशा काही पोस्ट करण्याची शक्यता आहे. यामुळे या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे.’

पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखील भामरे या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Share