कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करा – खा. जलील

औरंगाबाद : मनपाने औरंगाबाद शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करुन सद्यस्थितीत नागरीकांकडे थकीत असलेली पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे पत्राव्दारे केली.
खा. जलील यांनी पत्रात म्हटलं की, शहराला वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावे यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेकवेळा निवदने, लोकशाही  मार्गाने आंदोलने तसेच आक्रमक भुमिका घेत पाण्याच्या टाक्यांवर सुध्दा आंदोलने केलेली आहेत. महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाची सत्ता असतांना त्यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत, स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमकपणे मुद्दा उचलुन अनेक आंदालने केली होती; तसेच मी थेट लोकसभेत सुध्दा औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य नागरीकांना वेळेवर व मुबलक पाणी पुरवठा करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तरी सुध्दा मनपा व जिल्हा प्रशासनाने नागरीकांना पाणी पुरवठा व्हावा याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबविलेली नाही. आता मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली. आजपर्यत वार्षिक पाणीपट्टी वसूल करुन आठवड्यात केवळ एकदा पाणी दिले.त्यामुळे आधी नागरिकांनी भरलेली पाणीपट्टी  व्याजासह परत करावी आणि नंतर या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे.
किती दिवसांनी पाणी देणार? 
काही वर्षापुर्वी शहराला दोन दिवसांआड पाणी मिळेत होते. तेव्हा १८०० रुपये पाणीपट्टी होती. आता आठवड्यात एकदा, काही भागांमध्ये तर महिन्यात केवळ दोन किंवा तीन वेळा पाणी देत. आता पालकमंत्र्यांनी ५० टक्के पाणीपट्टी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मग नागरिकांना पाणी मिळणार का? मिळणार असेल तर ते किती दिवसांनी मिळेल? याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी खा. जलील यांनी केली.
Share