नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे बैजल यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी पाच वर्षे पाच महिने दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर आज त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
माजी आयएएस अधिकारी असलेले अनिल बैजल यांची ३१ डिसेंबर २०१६ रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बैजल हे १९६९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात डीडीएचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय गृह सचिव म्हणून कामकाज केले आहे. तसेच त्यांनी प्रसार भारती आणि इंडियन एअरलाइन्ससारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचेही नेतृत्व केले आहे. २००६ साली बैजल यांनी शहरी विकास विभागाचे सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते.
Delhi LG Anil Baijal resigns citing personal reasons. He has sent his resignation to the President: Sources
(file pic) pic.twitter.com/lmVxTdv8ZD
— ANI (@ANI) May 18, 2022
नजीब जंग यांच्या राजीनाम्यानंतर अनिल बैजल यांनी डिसेंबर २०१६ मध्ये दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (नायब राज्यपाल) म्हणून पदभार स्वीकारला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे बैजल यांचे नाव अनेकवेळा चर्चेत होते. दिल्लीतील आम आदमी पार्टीचे (आप) सरकार आणि नायब राज्यपाल बैजल यांच्यात विविध मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत होता. यावर्षीही कोरोनाच्या चौथ्या लाटेत दिल्ली सरकार आणि बैजल यांच्यात सम-विषम नियमांवरून एकमत झाले नव्हते. बैजल यांनी केजरीवाल सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकारही दिला होता.