खेळता-खेळता अचानक लागला फास अन् बालकाने गमावला जीव

बुलडाणा : मोबाईलवरील गेम आणि युट्यूबवरील साहसी व्हिडीओ पाहून तशीच कृती करण्याचा प्रयत्न एका बालकाच्या चांगलाच अंगलट आला. घराच्या पाठीमागे खेळायला गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

पूर्वेश वंदेश आवटे असे मृत पावलेल्या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. मृत पूर्वेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पूर्वेशचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात, तर फावल्या वेळेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी पूर्वेशच्या बहिणीचा देखील मृत्यू झाला आहे. आता १२ वर्षीय पूर्वेशचाही मृत्यू झाल्याने आवटे दाम्पत्याला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मंगळवारी मृत पूर्वेशचे वडील वंदेश आवटे हे कंपनीत कामाला गेले होते. पूर्वेश आणि त्याची आई दोघेच घरी होते. त्यावेळी पूर्वेश बाहेर खेळायला जातो, असे सांगून घराच्या मागच्या बाजूला गेला होता. घराच्या पाठीमागे असलेल्या एका लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. खेळता-खेळता अचानक त्याला फास लागला. ही बाब पूर्वेशच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवले आणि घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली.

त्यानंतर दोघांनी त्वरित पूर्वेशला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत पूर्वेशला मृत घोषित केले. पूर्वेशला मोबाईलवर गेम खेळण्याची आवड होती. मोबाईल गेम आणि युट्यूबवरील साहसी व्हिडीओ पाहून तशीच कृती करण्याचा तो सतत प्रयत्न करायचा. त्याच्या याच छंदामुळे त्याला गळफास लागला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Share