नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमक विरोध केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा वादात सापडला आहे. या दौऱ्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. “राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? ते मला माहिती नाही. उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांच्या विरुद्ध त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काही भूमिका घेतली होती. त्यांनी आधी उत्तर भारतीयांना विरोध करत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, आता एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले. त्यामुळे तिकडच्या काही लोकांनी यावर लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले असतील”, अशा शब्दांत राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, स्थानिक भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध करत “माफी मागेपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊलही ठेवू देणार नाही”, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील निशाणा साधला आहे. बृजभूषण सिंह यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते पैलवान आहेत, तरुण कुस्तीपटूंसाठी त्यांनी काम केले आहे. बृजभूषण सिंह हे लढवय्या असल्याने ते मागे हटणार नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
खा.राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशच्या जनतेच्या काही भावना असतील आणि त्यांचा उद्रेक एखादा नेता करत असेल, तर त्यांच्याशी आम्हाला संवाद साधावा लागेल. राज ठाकरे यांनी तिकडे एखादे घर घेतले, मठ किंवा आश्रम बांधला तरी तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचे नाते काही आजचे नाही. हे नाते राजकीय नाही. आम्ही तिकडे सतत जात असतो. राम मंदिर आंदोलनापासून आमचा अयोध्येशी संबंध आहे.
इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा
ज्ञानवापी मशिदीवरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे. या वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. भाजपकडून या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. दंगली पेटवून निवडणुका लढवणे दोन्ही बाजूंनी टाळायला हवे, असे राऊत म्हणाले. देशात सध्या फक्त मशीद आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजप सरकारने इथे खोदकाम करण्यापेक्षा चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर हस्तगत करून दाखवावे, अशी खोचक टिप्पणी खा. संजय राऊत यांनी केली. मी नुकताच लडाखला गेलो होतो. त्यावेळी एक लक्षात आले की, कैलास मानसरोवर, जे शंकराचे स्थान आहे, ते चीनच्या ताब्यात आहे. आमचे शिवजी तिकडे तपाला बसले आहेत. तुम्ही खरे हिंदुत्वावादी असाल तर चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवा, असे आव्हान खा. संजय राऊत यांनी भाजपला दिले.