भंडारा : ‘आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात’, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच आमदार निधी वाटपावरून चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, असा सल्लाही पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी नागपुरात केले होते. त्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘त्याला आता २५ वर्षे उलटून गेली आहेत. आता ते सोबतच आहेत त्यामुळे बघूया त्यांचे गुडलक कामाला येतेय का? असा खोचक टोला नाना पटोलेंना लगावला होता. नाना पटोले सध्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी, आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले आहे; पण आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा टोला आदित्य यांना लगावला.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत आहेत. अशा गंभीर तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्यानंतर आता अशा कामांना स्थगिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून, ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणे गरजेचे आहे. काँग्रेसनेही निधी वाटपात भेदभाव होत असल्याची तक्रार अनेक वेळा केली आहे. या गोष्टीमुळे समाजात चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.
राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झालेली नाही. प्रत्येक पक्षाचा मतांचा कोटा ठरलेला असून. सहाव्या सदस्याबाबत अजून बैठक झाली नसल्याने बैठक झाल्यावर भूमिका ठरवू, असे नाना पटोले म्हणाले.