मुलीच्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसात वडिलांची आत्महत्या

बीड : वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय ४४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या  शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी आसाराम दत्तू सांगळे हा ४४ वर्षीय हा शेतकरी मागील काही दिवसांपासून कर्जबाजारी झाला होता. चार-पाच दिवसांपूर्वी आसाराम सांगळे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पूर्वीचे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना भेडसावत होती.

मागील तीन-चार दिवसांपासून ते कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू, माझे कसे होणार, असे सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून आसाराम सांगळे यांनी मंगळवारी (१७ मे) सकाळी आठ वाजता आपल्या शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांनी विषारी औषध घेतल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले;
परंतु उपचार सुरू असतानाच आज गुरुवारी (१९ मे) त्यांची प्राणज्योत मालवली. आसाराम सांगळे यांच्या पश्चात आई, वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share