लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या; सीबीआयकडून १७ ठिकाणी छापे

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्या घरावर तसेच त्यांच्याशी संबंधित १७ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आणि पाटणा येथे ही छापेमारीची कारवाई केली आहे.

गेल्या महिन्यामध्येच लालू प्रसाद यांना झारखंड कोर्टाकडून चारा घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला होता. आता त्यांच्याशी संबंधित १७ ठिकाणांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यादव यांच्या या नव्या प्रकरणासंदर्भात दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमधील एकूण १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लालू प्रसाद यादव यांनी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री असताना लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याच्या आरोप करण्यात आला आहे. २००४ ते २००९ या लालूंच्या रेल्वेमंत्रिपदाच्या काळात अनेकांना राइट ऑफ करून रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे भरतीमध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने ही छापेमारीची कारवाई केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवींसह त्यांच्या मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई केली आहे. लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या १० सर्कुलर रोड येथेही सीबीआयचे पथक पोहोचले असून, तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडीदेवी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या सीबीआयच्या पथकात एकूण १० अधिकारी असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. यावेळी कोणालाही घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लालूंच्या मुलीचे ट्विट…
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य सीबीआयच्या छापेमारीनंतर संतापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले असून, जातीगणनेवरून लालू यादव यांना घाबरवण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरजेडी कार्यकर्ते रस्त्यावर
दरम्यान, सीबीआयच्या छाप्यांचा निषेध करत आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पाटणा येथे रस्त्यावर उतरले आहेत. लालू यादव यांचे भाऊ प्रभुनाथ यादव यांनी सीबीआयच्या या कारवाईवर टीका केली आहे. हा आरजेडी प्रमुखांना अडचणीत आणण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला जाणूनबुजून अशा प्रकारे त्रास दिला जातो हे दुर्दैवी आहे. यामागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती असल्याचेही प्रभुनाथ म्हणाले.

Share