राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव नाही; वंचितने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.

निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी केला.

Share