सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या भरकटलेले आहेत, त्यांना कधीच शरद पवार होता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि आमदार विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची ४-५ पुस्तके वाचावी, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आ. विद्या चव्हाण या रविवारी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात महाविकास आघाडी सरकार, शरद पवार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौरा स्थगित करण्याची कारणंही सांगितली. आ. विद्या चव्हाण यांना यावेळी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगाने विचारले असता, त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.
आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या, शरद पवार यांच्यावर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसते. ते सध्या भरकटलेले आहेत, त्यांना कधीच शरद पवार होता येणार नाही. शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची ४-५ पुस्तके वाचावी. कुठे गेली त्यांची ब्लू प्रिंट, ज्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचा विकास करणार होते. हा निश्चित त्यांच्या मनात राज्याविषयी तळमळ आहे, ते चांगले वक्ते आहेत. त्यांचे व्हिजन आहे. मात्र, ते सध्या भरकटल्यासारखे करत आहेत, अशी टीका आ.चव्हाण यांनी केली.
यावेळी आ.चव्हाण यांनी उजनी धरणातील पाण्याचा विषय, नवाब मलिक प्रकरण आदी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनिता रोटे, लता ढेरे मनीषा नलावडे, लता फुटाणे यांची उपस्थिती होती.