चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील कामाची कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा सिंगला यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, विजय सिंगला यांना अटकही करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री विजय सिंगला हे प्रत्येक निविदा किंवा आरोग्य विभागाच्या खरेदी व्यवहारांत अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे आली होती. सिंगला यांच्याविरोधात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमोर सक्षम पुरावे सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंगला यांची पदावरून हकालपट्टी केली. सिंगला यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा छडा लावण्यासाठी लागलीच मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये संबंधित मंत्री आणि त्यांच्या सहाय्यकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सिंगला यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर लगेचच सिंगला यांना पंजाबच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली. आता सिंगला यांची आम आदमी पार्टीतूनही हकालपट्टी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
I'm taking strict action against that minister, sacking him from cabinet&directing Police to register a case against him. That Minister is Vijay Singla. He had indulged in corruption in his dept, he also confessed to it. AAP has zero-tolerance policy against corruption: Punjab CM pic.twitter.com/RlXVDLVxHv
— ANI (@ANI) May 24, 2022
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का देत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केले आहे. कधीकाळी ‘स्टँडअप कॉमेडी’मध्ये करिअर घडवू पाहणारे भगवंत मान यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. शपथविधीनंतर अवघ्या महिन्याभरात एकामागोमाग निर्णय घेणाऱ्या भगवंत मान यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
देशाच्या इतिहासात दुसरीच घटना
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे सिंगला यांच्याविरोधात १० दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. दहा दिवसांत यासंदर्भात तपास करून सिंगला यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एखाद्या मुख्यमंत्र्याने आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्याविरोधात अशी कठोर कारवाई करण्याची ही देशाच्या इतिहासातील दुसरीच घटना ठरली आहे. याआधी आपच्याच सरकारमध्ये अशी घटना घडली होती. २०१५ साली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची अशा प्रकारे उचलबांगडी केली होती.
आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्री-आमदारांवर कोणतीच कारवाई केली नाही -मान
मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, विरोधी पक्ष म्हणतील अवघ्या दोन महिन्यांतच माझ्या सरकारच्या एका मंत्र्याने भ्रष्टाचार केला; पण अशा मंत्र्यांवर कठोर कारवाई करणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना अवैध वाळू उत्खननात कुणाचा हात होता हे माहिती होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. याउलट मी भ्रष्ट मंत्र्याची हकालपट्टी करण्यासह त्याच्यावर गुन्हाही दाखल करत आहे.
आम आदमी पार्टी का जन्म ईमानदार सिस्टम कायम करने के लिए हुआ है…@ArvindKejriwal जी ने हमेशा कहा है कि भ्रष्टाचार को बर्दाश्त नहीं करेंगे चाहे कोई अपना हो या बेगाना
स्वास्थ्य मंत्री के खिलाफ भ्रष्टाचार के सबूत मिलते ही तुरंत बर्खास्त किया…साथ ही FIR के आदेश दिए pic.twitter.com/0g9nqGteHb
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2022
मुख्यमंत्री भगवंत मान यांचा व्हिडीओ संदेश
हा प्रकार उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये भ्रष्टाचाऱ्यांना इशारा दिला आहे. “एक टक्का भ्रष्टाचार देखील सहन केला जाणार नाही. लोकांनी आपला मोठ्या आशेने निवडून दिले आहे. आपल्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील. जोपर्यंत या पृथ्वीचे अरविंद केजरीवाल यांच्यासारखे पुत्र आणि भगवंत मान यांच्यासारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरोधातील युद्ध सुरूच राहील, असे भगवंत मान यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.