लखनौ : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण विशेष न्यायाधीश महेंद्रकुमार पांडे यांच्या न्यायालयात वर्ग केले. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांच्या पत्नी किरण सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. ३० मे रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्या : विश्व वैदिक सनातन संघाची मागणी
मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात विश्व वैदिक सनातन संघाने याचिका दाखल केली होती. विश्व वैदिक सनातन संघाने या याचिकेत काही मागण्या केल्या आहेत. ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ मुस्लिमांना प्रतिबंध करण्यात यावा, ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदूंकडे सोपवण्यात यावा आणि हिंदूंना मशिदीच्या संकुलात कथितपणे सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.