केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर आज अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे नियमित तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात आले होते. यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले. यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. मॅथ्यू यांनी राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्याचे लीलावती रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लीलावती रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणार जाळीसारखा छोटा गोलाकार तुकडा) गरज असून, यामधील एक बसवण्यात आला आहे, तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार आहे.

नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही पहिली वेळ नाही. २००९ मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणे यांच्या छातीत दुखत होते. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळीही नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

Share