एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाने घेतली आदित्य ठाकरेंची भेट

मुंबई : शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला माहीत आहे. या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असताना औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांनी शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची लंडनमधील एका कार्यक्रमात भेट घेतली. फोटोही काढले. या दोघांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीवरून औरंगाबादसह राज्यात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने परदेशात आहेत. आदित्य ठाकरे लंडनमध्ये असताना एका कार्यक्रमात औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी काही वेळ एकमेकांशी संवाद साधला. तसेच संवादानंतर एकमेकांचा निरोप घेताना त्यांनी फोटोही काढले. या दोन युवा नेत्यांमध्ये काही वेळ का होईना छान गप्पांची मैफल रंगली. राजकारणविरहित गोष्टींवर १५ मिनिटे ओझरती चर्चा झाली. राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर आदित्य ठाकरे आणि बिलाल जलील यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अनेक वेळा दाखले दिले जातात. दोन भिन्न विचारसरणीच्या नेत्यांच्या भेटीसाठी झाल्या की, चर्चेला उधाण येते, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख होतो. शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील राजकीय हाडवैर महाराष्ट्रासह संपूर्ण देश जाणतो. शिवसेनेचे कट्टर हिंदुत्व विरुद्ध एमआयएमचे कट्टरपंथी राजकारण यांच्यातला वादही महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिला. या दोन्ही पक्षांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो की, औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा मुद्दा असो, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून एमआयएम आणि शिवसेना यांच्यामध्ये राजकीय सुंदोपसुंदी चाललेली असताना, आदित्य ठाकरे आणि बिलाल जलील यांची लंडनमध्ये झालेली ही भेट आणि त्यांच्यात रंगलेली गप्पांची मैफल पाहता दोन्ही पक्षात कुजबुज ऐकायला मिळत आहे.

कुछ बाते हो चुकी हैं, कुछ बातें अभी हैं बाकी…!
जवळपास १५ ते २० मिनिटांच्या गप्पानंतर दोघा नेत्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. ‘कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी है बाकी….’ या गीताचे बोल आठवून त्यांनी ‘पुन्हा भेटूयात’ म्हणत एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांचा निरोप घेतला. राजकीय मतभेद मागे सोडून दोन भिन्न विचारसरणीच्या या दोन युवा नेत्यांची झालेली भेट चर्चेचा विषय बनली आहे.

Share