बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयाने झटका दिला आहे. भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने २६ मे रोजी अटक केली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयने येस बँक आणि डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २७ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर आज सीबीआयने भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. सीबीआयने भोसलेंची १० दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळला. न्यायाधीश शिंगाडे यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर भोसले यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. याआधी भोसले यांना सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये तीन दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले होते. न्यायालयाचा हा आदेश म्हणजे अविनाश भोसले यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

अविनाश भोसले यांच्यावर आरोप काय?
येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये ३ हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने उद्योगपती अविनाश भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्ट्या सहभाग आढळल्यामुळे त्यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली. दरम्यान, याअगोदरही उद्योगपती अविनाश भोसले यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे दिवंगत कॉँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे व्याही आणि महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती असून, कोट्यवधी रूपयांच्या ‘एबीआयएल’ ग्रुपचे ते मालक आहेत. ‘रिअल इस्टेट किंग’ अशीही त्यांची ओळख आहे. पुण्यातील बाणेर भागात त्यांचे अलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांच्या घरावर हेलिपॅडही बनवण्यात आले आहेत. राजकारणी लोकांना ते हेलिकॉप्टर्स भाड्याने देतात. मुंबई, पुणे आणि इतर अनेक ठिकाणी त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. उंची राहणीमानामुळे ते सतत चर्चेत असतात.

Share