हनुमान जन्मस्थळाचा वाद विकोपाला; नाशिकमध्ये साधू, महंतांचा राडा

नाशिक : हनुमान जन्मस्थळ नेमके कोणते यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. हा वाद सोडवण्यासाठी महंत अनिकेत देशपांडे यांच्या नाशिकरोड येथील पीठात आज मंगळवारी शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून दोन्ही बाजूच्या महंतांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पहायला मिळाली. आसन व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादात महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद सरस्वती यांच्यावर बूम उगारला आणि नव्या वादाला तोंड फुटले.

नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा नाशिकचे साधू, महंत यांच्यासह अंजनेरी ग्रामस्थांनी केला आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील किष्किंधा येथील मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी नसून किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. त्यांनी नाशिकच्या साधू, महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे.

गोविंदानंद सरस्वती यांचे हे आव्हान स्वीकारत नाशिकच्या साधू, महंतांसह अंजनेरीचे गावकरी एकत्र आले आहेत. स्थानिक महंत आणि अभ्यासकांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करीत पुराव्यानिशी ते सिद्ध करण्याची तयारी केली आहे. गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केल्यानंतर त्याविरोधात नाशिकमधील महंत, पुजारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दोन्ही बाजूकडून हनुमान जन्मस्थळाचा दावा केला जात असताना प्रमाण आणि दाखले दिले जात आहेत.

मूळ विषय बाजूलाच; खुर्चीवरून वाद
अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी आज नाशिकरोड येथे शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी दोन्ही बाजूच्या महंतांकडून बसण्याच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झालेली पहायला मिळाली. अक्षरश: दोन्ही बाजूचे महंत हमरीतुमरीवर उतल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सभेचा मूळ विषय बाजूलाच राहिला आणि काही वेळ मान-अपमानाचा गोंधळ उडाला होता.

गोविंदानंद सरस्वती स्वामी वर येऊन बसल्याने अन्य साधूंनी आक्षेप घेतला. यामुळे साधूंमध्ये खुर्चीचा वाद सुरू झाला. आसनव्यवस्था समसमान करण्याची तसेच गोविंदानंद सरस्वती यांनी खाली बसावे, अशी मागणी करण्यात आली. तुम्ही विद्वान असाल, साधू असाल, मात्र आमचा मान राखावा, असे नाशिकच्या साधूंनी गोविंदानंद यांना सुनावले.

शंकराचार्य यांना काँग्रेसी म्हटल्याने चिघळला वाद
वादविवाद सुरू असतानाच गोविंदगिरी यांचे गुरू शंकराचार्य यांना महंत सुधीरदास पुजारी यांनी काँग्रेसी म्हटल्याने वाद चिघळला. गोविंदगिरी यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. मात्र, यावेळी अचानक आक्रमक झालेल्या महंत सुधीरदास पुजारी यांनी मीडियाचा बूम माईकच गोविंदानंद सरस्वती यांच्यावर उगारला. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाचा वाद बाजूला राहिला आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. साधूंना दिलेल्या पदव्यांवरून खडाजंगी झाली. त्यानंतर गोविंदानंद सरस्वती हे संतापले आणि उभे राहून माफी मागण्यासाठी आग्रह धरला. जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिक सोडणार नाही, अशी भूमिका गोविंदानंद सरस्वती यांनी घेतली. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

Share