सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उधारी थकवल्याचा आरोप करत सांगोल्यात एका हाॅटेलमालकाने खोत यांची गाडी अडवून राडा केला होता. याप्रकरणी हॉटेलमालक अशोक शिनगारे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल ‘मामा-भाचा’चे राहिलेले ६६ हजार ४५० रुपये बिल सदाभाऊ खोत यांनी अद्याप दिले नसल्याचे
हॉटेलमालक अशोक शिनगारे यांचे म्हणणे आहे. वारंवार फोन करूनही सदाभाऊ पैसै देत नसल्याचा आरोप या हाॅटेल मालकाने केला आहे. सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले असताना अशोक शिनगारे यांनी सांगोला येथील पंचायत समितीच्या आवारात सदाभाऊ खोत यांना अडवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ‘हॉटेलची उधारी द्या, मगच पुढे जावा, असे म्हणत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारीसाठी शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.
या सर्व प्रकारावर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. दरम्यान, आपल्याला बदनाम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा हा डाव असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. टोमॅटोसारखे गाल असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याचे हे षडयंत्र असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. खोत म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहादेखील घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते. २०१४ नंतर मी २०-२५ वेळा सांगोल्याचा दौरा केला. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही आणि काही सांगितले नाही. कोण जेवले, कुणी पाठवले, त्याबाबत काही माहिती आहे का तेही मला आढळून आले नाही.
हा सर्व प्रकार झाला तेव्हा सर्व मीडिया तेथे सुसज्ज होता. त्यामुळे मी याचा शोध घेतला तर अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे अस समजले. २०२० मध्ये कर्नाटकमधून सोने चोरीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात दाखल आहे. तसेच शिनगारे याच्याविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे. यानंतर आम्ही याचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेतला. त्या व्यक्तीच्या फोनवर कुणाचे फोन आले, त्याला अटक केल्यावर पोलिसांना कुणी फोन केले त्याचे रेकॉर्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
खोत म्हणाले, यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता आहे. त्या नेत्यानेच या व्यक्तीला तू फक्त असे बोलत राहा आणि आम्ही त्याचे शूटिंग करून पसरवतो म्हणून सांगितले. मात्र, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या या टोमॅटोला सांगतो की, असे षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार नाही. मी सरकारी समितीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्यामुळे कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत आनंद कुलकर्णी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. ते कशाला गुन्हा दाखल करायचा म्हणत होते. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल, असे खोत म्हणाले.
राष्ट्रवादीकडून सातत्याने मला धमकावण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, विरोधी पक्षनेते यांच्याकडे मागणी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गुन्हेगारांना सांगून मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही. रयत क्रांती संघटना याचा समर्थपणे मुकाबला करेल, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.