दहावीच्या निकालात मुलींची बाजी; ९६.९४ टक्के निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) लागला आहे. औरंगाबाद विभागाचा ९६.३३ तर लातूर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे. दहावी परीक्षेत ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. यंदा कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दहावीची परीक्षा झाली होती. त्यामुळे दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागली होती. अखेर आज (१७ जून) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यंदा दहावी परीक्षेचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील एकूण १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर २९ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता. सन २०२० च्या तुलनेत २०२२ चा दहावीचा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता. यावर्षी एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २४ विषयांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

उत्तीर्ण झालेल्यांमध्ये नियमित मुलींची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. राज्यातील ९ विभागातून एकूण ५४ हजार १५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी (रिपीटर) नोंदणी केली. त्यापैकी ५२ हजार ३५१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले. त्यापैकी ४१ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.

असा आहे विभागनिहाय निकाल
पुणे : ९६.१६ टक्के
नागपूर : ९७.०० टक्के
औरंगाबाद : ९६.३३ टक्के
मुंबई : ९६.९४ टक्के
कोल्हापूर : ९८.५० टक्के
कोकण : ९९.२७ टक्के
नाशिक : ९५.९० टक्के
लातूर : ९७.२७ टक्के
अमरावती : ९६.८१ टक्के

(एकूण निकाल : ९६.९४ टक्के)

दृष्टिक्षेपात निकाल
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी (नियमित) :- १५ लाख ८४ हजार ७९०
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी :- १५ लाख ६८ हजार ९७७
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी :- १५ लाख २१ हजार ००३
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :- टक्के ९६.९४

२९ शाळांचा निकाल शून्य टक्के
राज्यातील २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. ५ शाळांचा १० ते २० टक्के तर ४ शाळांचा २० ते ३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के तर १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७० ते ८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८० ते ९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३० तर ९० ते ९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.

विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
या संकेतस्थळांवर दहावीचा ऑनलाईन निकाल पाहता येईल.

राज्यातील १६४७९८ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत. यामध्ये चित्रकला/कला – १२८७४५, क्रीडा – १५५३०, स्काऊट गाइड – ५४२, नाट्यकला – ७, लोककला – १४५४९, शास्त्रीय नृत्य – १९४५, शास्त्रीय गायन – २०३६, शास्त्रीय वादन – १४४४ विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण प्राप्त केले आहेत.

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी २० जून ते २९ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत २० जून ते ९ जुलैपर्यंत आहे. शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.

१० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैपासून सुरू होणार
१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत असेल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होणार असून, ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असेल. १२ वी पुरवणी परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे, तर १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात होणार आहे.

Share