सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांच्याबाबत अतुल भातखळकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप नेते संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. ट्वीटर अकाऊंटवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर अनेक काँग्रेस नेत्यांनीही टीका केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अतुल भातखळकर यांनी नेमके काय ट्विट केले होते?
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जुलै महिन्यात ईडीने चौकशी केली होती. त्यापूर्वी ईडीने सोनिया गांधींना समन्स पाठवले होते. मात्र, त्याचदरम्यान कोरोना संसर्ग झाल्यामुळे सोनिया गांधींनी चौकशीस हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यावरूनच भातखळकर यांनी सोनिया गांधींवर टीका करत ट्विट केले होते. ‘कोरोनाचा ईडी व्हेरीयंट’ असे ट्विट भातखळकर यांनी केले होते.

Share