मनसे भाजप युती होणार? दोन दिवसांत भाजपचे दोन मोठे नेते राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप मधील जवळीक वाढत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. अशातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटी भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील काल ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठी भाजपा-मनसेच्या युतीचे संकेत मानले जात आहेत. भाजप-मनसे नेत्यांच्या भेटीगाठींमध्ये राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जातानाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येऊल लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडच्या काळात सातत्याने भाजपला पुरक भूमिका घेताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी राज ठाकरे यांच्या मनसेने भाजपच्या पारड्यात मत टाकले होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीमुळे राज्यात अस्थिर राजकीय वातावरणाचा मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला कसा फायदा होईल, यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते हे सर्व मुद्दे लोकांसमोर प्रभावीपणे मांडतात. याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Share