केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; आठ कामगारांचा होरपळून मृत्यू

हापूर (उत्तर प्रदेश) : केमिकल फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर २० कामगार गंभीर भाजले. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील धौलाना येथील यूपीएसआयडीसी परिसरात असलेल्या रुही इंडस्ट्रीजमध्ये आज शनिवारी (४ जून) ही दुर्घटना घडली. या कारखान्यात आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

धौलाना येथील यूपीएसआयडीसी परिसरात असलेल्या रुही इंडस्ट्रीज या कारखान्यात केमिकल तयार केले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. ही दुर्घटना घडली त्यावेळी या कारखान्यात सुमारे २५ कामगार काम करीत होते. बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आठ कामगार जिवंत जळाले, तर अन्य २० कामगार गंभीर भाजले. स्फोटाची तीव्रता अतिशय जास्त होती. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आठ कामगारांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारखान्यात मदतकार्य सुरू आहे. कारखान्यात दोन डझन लोक अडकल्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि अग्निशमन दल प्रयत्न करीत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापूर जिल्ह्यात बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत आठ कामगारांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या प्रकरणाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Share