होय हे संभाजीनगरचं..! शिवसेनेकडून बॅनरबाजी, नामांतराची जोरदार चर्चा

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेनेकडून ‘होय, हे संभाजीनगरच’, अशा आशयाचे मोठमोठे बॅनर शहरात लावण्यात आले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ८ जूनच्या सभेत शहराच्या नामांतराची घोषणा करतील का?, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

येत्या ८ जून रोजी औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सभेला काही दिवस बाकी असताना शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी आज नामांतराची गोड बातमी सभेत उद्धव ठाकरे देतील, अशी आशा व्यक्त केली आहे. तर कालच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे वक्तव्य केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध चौकात बॅनरबाजी सुरू झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभेत नामांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेऊन अनेक दशके उलटली आहे. मात्र, शहराचे नामकरण करण्यात शिवसेनेला यश मिळाले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने याच विषयावरून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेनेला डीवचण्यासाठी मनसेने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात बॅनर लावले होते. शिवसेनेला जमत नसेल तर आम्ही शहराचे नाव बदलू असे थेट बॅनर मनसेने लावले होते. त्यामुळे ८ जून रोजीच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे.

Share