रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात; ३ ठार

रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला. आज (८ मे) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे काही नागरिक एका कार्यक्रमासाठी ठाणे ते श्रीवर्धन या खासगी बस (क्र. एमएच ०४/एफ्के ६६१६) ने आपल्या गावी जात होते. आज रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घोणसे घाटात ही बस पुलावरून ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हसळा पोलिस ठाण्याचे प्रभारी उद्धव सुर्वे यांनी सांगितले. या घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून, अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

Share