पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ३ जण ठार, १ जखमी

पुणे : शुक्रवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त कारला पाठीमागून आलेल्या एका ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे.

नीलेश कुमार सी. (वय ४२), संजना माहेश्वरी (वय २७), जिथ्या त्रिलेश (वय ११, सर्व रा. मीनाक्षीनगर, बंगळुरू) आणि अरींनी एन. (वय ४१, रा. बंगळुरू) हे महिंद्रा कंपनीच्या कारमधून बंगळुरूकडे निघाले होते. काल शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता ते पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यापासून पुढे आले. तेथून काही अंतरावर वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर एक कंटेनर उभा होता. त्याच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, बॅरॅकेटेड किंवा टेललाईट याची व्यवस्था केलेली नव्हती. कारचालकास रात्री अंधारात तो नीट दिसला नाही. त्यामुळे ही कार कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. त्याचवेळी अपघातग्रस्त कारला मागून आलेल्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून जोरात धडक दिली.

या अपघातात नीलेश कुमार सी., संजना माहेश्वरी आणि जिथ्या त्रिलेश (सर्व रा. मीनाक्षीनगर, बंगळुरू) हे तिघेजण ठार झाले तर अरींनी एन. (रा. बंगळुरू) या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रक व कंटेनर वरील चालक जखमींना मदत न करता पळून गेले. याबाबत धोंडीराम जयसिंग वड्ड (वय ३९, रा. वडवाडी) यांनी वडगाव पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी सकाळी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share