मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा : पंकजा मुंडे

बीड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे.
अशावेळी मी विधान परिषदेवर जावे ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. मात्र, शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्यसभेची रणधुमाळी सुरू असताना राज्यातही विधान परिषदेच्या १० जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २० जूनला मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा १ आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. तत्पूर्वी, रिक्त होणाऱ्या १० जागांवर कुणाला संधी मिळू शकते तर विद्यमान आमदारांपैकी कुणाला डच्चू मिळू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे. इच्छुक नेत्यांची आपापल्या पक्षाकडे, नेत्यांकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४ आमदार निवडून येऊ शकतात. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होत आहे.

दरम्यान, आज बीड येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे; पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असेही त्या म्हणाल्या.

सर्वांनी मिळून छत्रपती संभाजीराजेंचा सन्मान करायला पाहिजे होता
राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांना माघार घ्यावी लागते, याबद्दल मी दुःख व्यक्त करते, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर खंत व्यक्त केली आहे. सर्वांनी मिळून छत्रपती संभाजीराजेंचा सन्मान करायला पाहिजे होता. जर सर्वांनी मिळून प्रयत्न केले असते तर संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवता आले असते;पण तसे होऊ शकले नाही, असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येकाकडे अधिकची मते होती, ती संभाजीराजेंना द्यायला पाहिजे होती. भाजपने संभाजीराजे छत्रपतींना राष्ट्रपतीच्या कोट्यातून खासदारकी दिली होती. आता छत्रपती उदयनराजे हे राज्यसभेवर खासदार आहेत. छत्रपतींचा सन्मान राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आतासुद्धा शरद पवार साहेबांनी संभाजीराजेंना मदतीची घोषणा केली होती. सर्वांनी मिळून तसा निर्णय घेतला असता तर झाले असते. मात्र, तसे होऊ शकले नाही याचे दुःख आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

Share