पुणे : चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप पाठक सध्या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम’ च्या जयघोषात संदीप पाठक भक्तिरसात न्हाऊन गेला आहे. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची’ अशीच काहीशी अनुभूती मागील काही दिवसांपासून संदीप पाठक घेत आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता संदीप पाठक यंदा पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाला आहे. एखाद्या वारकऱ्याप्रमाणेच तो मनोभावे या वारीत रंगला आहे. आळंदी (देवाची) येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आणि अलंकापुरीहून वारकऱ्यांसोबत इंद्रायणी ते चंद्रभागा असा संदीप पाठकचाही प्रवास सुरू झाला. कपाळाला गोपीचंदन टिळा, हातात भगवी पताका, डोक्यावर वारकरी टोपी आणि सदरा असा वेश धारण केलेला संदीप सध्या ‘लावूनी मृदुंग स्मृती टाळ घोष सेवू ब्रम्हरस आवडीने…’ असाच काहीसा अनुभव घेत आहे.
https://www.instagram.com/p/CfLOH3ppFG2/?utm_source=ig_web_copy_link
या वारीमध्ये तो प्रत्येक वयोगटातील वारकरी मंडळींना आवर्जून भेट घेत आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा आशीर्वाददेखील घेत आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत जेजुरीमध्ये संदीप पाठकने बेल भंडारा उधळला. गोंधळ्यांचे वाद्यही वाजवले. इंदापूरमध्ये डोळ्याचे पारणे फेडणारा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळाही संदीपने अनुभवला. कधी हातात टाळ घेऊन, कधी खांद्यावर वीणा घेऊन, तर कधी पखवाजवर थाप मारत पाऊस-पाण्याची पर्वा न करता संदीपही या आनंद सोहळ्यात चिंब न्हाऊन गेला आहे.
संदीपही झाला ‘माऊलीमय’
पंढरपूरच्या वाटेवर संदीपला त्याचे चाहते असलेल्या असंख्य वारकऱ्यांचे प्रेम मिळाले. बऱ्याच जणांनी संदीपचे चित्रपट आवर्जून पहात असल्याची प्रतिक्रिया दिली. या प्रवासात एकीकडे संदीपला बालवारकरी भेटत आहेत, तर दुसरीकडे नव्वदी गाठत आलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा आशीर्वाद त्याला मिळत आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत चालणाऱ्या महिला वारकरी संदीपच्या मुखावरून हात फिरवत कौतुक करत आहेत. ‘माऊली, माऊली’च्या गजरात भक्तिमय झालेल्या वातावरणात संदीपही जणू ‘माऊलीमय’ झाला आहे.
करोडपती माणसांनाही इतकं प्रेम मिळत नाही
संदीपला या वारीमध्ये वारकऱ्यांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. चाहत्यांना निराश न करता त्यांच्याबरोबर तो फोटोदेखील काढताना दिसत आहे. वारकऱ्यांचे आपल्यावर असणारे प्रेम पाहून संदीप अगदी भारावून गेला आहे. दिवंगत अभिनेते सतीश तारे यांच्यानंतर तुमच्यासारखा नट पहिला नसल्याची प्रतिक्रिया एका फळविक्रेत्याने व्यक्त केली. तुमच्या रूपात चित्रपट-नाट्यसृष्टीला सच्चा कलाकार मिळाल्याची प्रतिक्रिया ऐकून संदीप खऱ्या अर्थाने धन्य झाला. वारकऱ्यांकडून मिळालेले प्रेम पाहून भारावून गेलेला संदीप म्हणाला की, ”करोडपती माणसांनाही इतकं प्रेम मिळत नाही.” संदीपने वारीदरम्यानचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CfVqMp9ppOc/?utm_source=ig_web_copy_link