बंगळुरू : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूमध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तेथे सुरू असलेल्या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली सहा जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. यामध्ये सिद्धांत कपूरचादेखील समावेश आहे.
बंगळुरू पोलिसांनी एएनआयला दिलल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री पार्टी सुरू होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ या हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी हॉटेलमध्ये चाललेल्या बड्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर तेथे सिद्धांत कपूरदेखील हजर होता. पोलिसांनी या पार्टीतील काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची रक्त तपासणी केली असता, त्यामध्ये काही जणांनी अमली पदार्थांचे म्हणजे ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले. ज्यामध्ये सिद्धांत कपूरदेखील आहे. सिद्धांत कपूरसह सहा लोक ड्रग्ज सेवनात पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सिद्धांत कपूरला रविवारी रात्री म्हणजेच १२ जूनच्या रात्री ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जच्या तपासात सिद्धांतचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला अलसूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. हॉटेलमधील पार्टीदरम्यान सर्वजणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते की, ते ड्रग्ज घेऊन पार्टीला आले होते, हे अद्याप समजू शकलेले नाही.
Karnataka | Actor Shraddha Kapoor's brother Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party in a Bengaluru hotel, last night. He is among the 6 people allegedly found to have consumed drugs: Bengaluru Police pic.twitter.com/UuHZKMzUH0
— ANI (@ANI) June 13, 2022
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली.आता या यादीत सिद्धांत कपूरचेही नाव जोडले गेले आहे. याआधी सिद्धांतची बहीण आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने चौकशी केली होती; पण त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. आता मुलगा सिद्धांतच्या ड्रग्ज सेवनाच्या बातमीने त्याचे वडील शक्ती कपूर यांना धक्का बसला आहे. माध्यमांनी यासंदर्भात शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी, सिद्धांत असे करूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप या प्रकरणी श्रद्धा कपूरकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
या सिनेमांमध्ये दिसला सिद्धांत कपूर
सिद्धांत कपूरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘भूल भुलैया’, ‘भागम भाग’, ‘चुप चुपके’ आणि ‘ढोल’ यांसारख्या सिनेमांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. २०१३ मध्ये त्याने संजय गुप्ता यांच्या ‘शूटआऊट अॅट वडाळा’ सिनेमात काम केले होते. तसेच जजबा, हसिना पारकर आणि चेहरे या चित्रपटात त्याने अभिनयही साकारला आहे. याशिवाय तो ‘अग्ली’ सिनेमा आणि ‘भौकाल’ या वेबसीरिजमध्येही दिसला होता.
काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ‘एनसीबी’ने कार्डीलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या वर्षी अटक केली होती. यासाठी आर्यनला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला होता. काही दिवसांपूर्वी ‘एनसीबी’ने या प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. ‘एनसीबी’ने या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यातून आरोपींच्या यादीतून आर्यन खानचे नाव पुराव्यांअभावी वगळण्यात आले आहे. आता अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खलबळ उडाली आहे.