पुण्यात ट्रॅव्हल्स बसचालकाकडून महिलेचे अपहरण करून बलात्कार

पुणे : ट्रॅव्हल्स बसचालकाने पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट आणि कात्रज परिसरात या ट्रॅव्हल्स बसचालकाने सदर महिलेवर दोनदा बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल बसचालक नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८ वर्षे, रा.वडापुरी, ता.इंदापूर) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

कामाच्या शोधात पीडित २१ वर्षीय महिला तिच्या पतीसोबत वाशिम येथून पुण्यात आली होती. हे दोघेही खोलीच्या शोधात होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बसचालक आरोपी नवनाथ शिवाजी भोंग याने या दाम्पत्याला एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार नाही, तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, असे सांगितले. आरोपी नवनाथ भोंगवर विश्वास ठेवून हे दोघे पती-पत्नी त्याच्या बसमध्ये आराम करण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळाने पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपी भोंग याची नियत फिरल्याने त्याने संधी साधत अचानक बस सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले.

त्यानंतर आरोपी भोंग याने स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारून टाकेन’ अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर महिलेवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. यानंतर आरोपीने महिलेला बसमधून खाली उतरवले आणि तेथून पसार झाला. पीडित महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी ट्रॅव्हल्स बसचालक नवनाथ भोंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करीत आरोपीला बंगळुरू हायवेवर जेरबंद करण्यात यश मिळवले. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share