‘पावनखिंड’ नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘हा’ चित्रपट येणार मोठ्या पडद्यावर

मुंबई : फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आणखी एक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’ हा तिसरा चित्रपट होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसादही दिला. आता यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’असं या चित्रपटाचं नाव आहे.

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मिडीयावर पोस्टर शेयर करत याची माहिती दिली आहे. तसेच अभिनेता चिन्मय मांडलेकरांनी यात छत्रपती शिवरायांची भुमिका साकारली आहे. त्यांनी देखील सोशल मिडीयावर चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे.  या टीझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे. येत्या २२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.

Share