‘अग्निवीरांना’ सैन्य दलातील चार वर्षांच्या सेवेनंतर महिंद्रा उद्योग समूहात नोकरीची संधी

मुंबई : केंद्र सरकारने नुकतेच सैन्य दलातील भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. देशभरात हा गदारोळ सुरू असताना महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा उद्योग समूहाने लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर प्रशिक्षित आणि पात्र अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने १४ जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दल या लष्कराच्या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ भरती योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षे संरक्षण दलात सेवा द्यावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. लष्कराच्या वतीने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. ‘अग्निवीर’ ही भारतीय सैन्यात एक वेगळी श्रेणी असेल आणि ते कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती केले जाऊ शकतात. अधिकृत गुप्तता कायदा, १९२३ अंतर्गत, अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेदरम्यान मिळालेली गोपनीय माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करण्यास मनाई असेल, असे लष्कराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ ही योजना जाहीर केल्यापासून अनेक राज्यांमध्ये सातत्याने आंदोलने केली जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. ‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना महिंद्रा उद्योग समूहामध्ये नोकरी देण्याची घोषणा उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली आहे. आनंद महिंद्रा यांनी सोमवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

‘अग्निपथ’ योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे मी दुःखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की, ‘अग्निवीर’ जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अग्निवीरांना कोणते पद दिले जाईल, असा प्रश्न एका व्यक्तीने आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर केला. यावर ते म्हणाले की, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांच्या रोजगाराला भरपूर वाव आहे. नेतृत्व, टीमवर्क आणि शारीरिक प्रशिक्षणासह, अग्निवीर उद्योगाला बाजारपेठ तयार करण्यात मदत करतील. यात ऑपरेशन्सपासून प्रशासन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचा समावेश असेल.

Share