पालकच ‘हाऊ आर यू’ म्हणत असतील तर मराठी भाषा कशी टिकेल? अरुण नलावडे यांचा सवाल

मुंबई : नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणून अरुण नलावडे यांना ओळखले जाते. कणखर पिता, प्रेमळ काका किंवा हसवणारे आजोबा अशी कोणतीही भूमिका समरसून करणारे अरुण नलावडे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते आहेत. अरुण नलावडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी भाषेसंदर्भात परखड भाष्य केले. जर पालकच आपल्या मुलांना इंग्रजीतून ‘हाऊ आर यू’ म्हणत असतील तर मराठी भाषा टिकेल कशी? असा प्रश्न करीत मराठी भाषा जपायची असेल तर त्याची सुरुवात घरातून करायला हवी, असे अरुण नलावडे यांनी म्हटले आहे.

अरुण नलावडे यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अगदी साध्या भूमिकाही ताज्या केल्या. सध्या अरुण नलावडे हे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. अरुण नलावडे हे नेहमी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसतात. नुकतेच त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठी भाषा सक्तीबद्दल भाष्य केले आहे. मराठी भाषा सक्ती, मुलांचे शिक्षण याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, “आपली भाषा ही आपल्या घरातून सुरू झाली पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. जर एक वर्षाच्या मुलासोबत त्याचे आई-वडील इंग्रजीतून बोलण्यास सुरुवात करणार असतील तर आपली मराठी भाषा टिकणारच कशी? आपण ती मुलांना शिकवली पाहिजे. मुलांना ती आवडत नाही. असे कोणी ठरवले? त्यांना ती आवडते.”

”आपणच मुलांसमोर ‘हाऊ आर यू’, ‘प्लीझ,’ ‘सॉरी’ असे शब्द मुलांसमोर म्हटले तर त्यांना मराठी शब्द कळणार कसे? त्यामुळे मराठी भाषा ही आपल्या घरातून सुरू झाली पाहिजे. लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. तुम्ही जसे त्यांच्यासमोर वागता त्याचेच अनुकरण होते आणि तेच मुलं पुढे नेतात. त्यामुळे त्या भाषेची सुरुवात किंवा त्याचा अभ्यास हा घरातून सुरू व्हायला पाहिजे. शाळेत कोणती भाषा शिकवली जाणार हे नंतरचे; पण घरी कोणती भाषा आपण बोलतो, ते महत्त्वाचे असते. भाषा टिकण्यासंदर्भात आपण सरकारला बोल लावतो; पण आपणही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपण दरवेळी सरकारला किंवा राजकारणी लोकांना शिव्या देत राहतो; परंतु आपण स्वत: काय करतो? आपल्यापासून सुरुवात का होत नाही? असा अंतर्मुख होऊन विचार करावा असे मला वाटते”, असेही ते म्हणाले.

https://www.instagram.com/reel/CXQoJj3qPXJ/?utm_source=ig_web_copy_link

“मी माझ्या मुलाला मराठी शाळेतून शिकवले आहे. त्याला फार सज्ञान आणि हुशार बनवले आहे. त्यानंतर आता तू कोणतीही भाषा शिक, अशी वेळ आपण आणली पाहिजे”,असे सांगून मालिकांच्या टीआरपीवर बोलताना अरुण नलावडे म्हणाले, ”टीआरपी म्हणजे काय हेच इतक्या वर्षांत मला कधी कळलेले नाही. मी त्यात पडतही नाही. मी करत असलेली एक मालिका याच कारणास्तव बंद झाली होती;. पण त्याबद्दलची वाहिन्यांची गणितं वेगळी असतात. ग्रामीण, शहरी प्रेक्षक असे वर्गीकरण केले जाते. विशिष्ट भागांत विशिष्ट मालिका बघण्याची कारणे वेगळी असतात. असे सगळे निकष लावले जातात. त्यामुळे कोणतीही वाहिनी या सगळ्याचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करते. मात्र, ‘टीआरपी’मुळे दर्जात्मक मालिका चिरडली जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा आहे. हल्ली अनेक सीरिजमधून जे दाखवले जाते पाहून असे वाटू लागलेय की, समाजात चांगले, पवित्र असे काही आहे की नाही?

https://www.instagram.com/p/CXN_jFRACWU/?utm_source=ig_web_copy_link

 

Share