अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट रिलीज, बॉक्स ऑफिसवर दिसणार का जादू ?

‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट आज ३ जून रोजी रिलीज झाला आहे. अक्षय कुमारची यात मुख्य भूमिका असणार आहे. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र, रिलीजपूर्वीच अक्षयच्या या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते. यासोबतच अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करु शकेल का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

या आधी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. मात्र, ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय चमत्कार दाखवू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचा अहवाल समोर आला आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत संथ सुरुवात झाली आहे. ही कमाई कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’पेक्षा कमी आहे.  या चित्रपटाची आतापर्यंत केवळ १० हजार तिकिटे विकली गेली आहेत, जी निराशाजनक आकडेवारी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया २’च्या रिलीजपूर्वी ३० हजार तिकिटांची विक्री झाली होती. अशा परिस्थितीत अक्षयचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

Share